क्षण चमकते
लाॅकडाऊनमध्ये दुपारी सहज गॅलरीत आलो. रस्त्यावर एक दोन वाहने येत जात होती. निर्मनुष्य रस्त्यावर फक्त समोरच्या पिंपळाची सळसळ ऐकू येत होती. चिंचेला नवीन पालवी आलेली. आकाशाशी त्याही पानांचा काहीतरी संवाद सुरु होता.
अचानक माझे लक्ष गॅलरीतून वार्यावर हेलखावे खात लहणार्या तुळशीच्या नाजूक मंजिर्यांकडे गेले. इवली इवली जांभळी फुले मंजिर्यांवर आलेली असावी. कधी एवढे बारकाईने पाहिलेले नव्हते त्यामुळे नवल वाटले. आणखी नवल वाटले ते इवलाशी मधमाशी हवेतल्या हवेत पंखांची विद्युतगतीने वेगात हालचाल करत तेवढ्या उंचावर त्या हेलकावत्या मंजिर्यांवरील इवल्या जांभळ्या फुलांवर बसण्याचा प्रदीर्घ प्रयत्न करीत होती.
आश्चर्य वाटले. जीव तो केवढा. पंख इवले. पण एवढ्या विलक्षण लहरत्या प्रसंगात एकसारखा किती प्रयत्नशील आहे! एवढे प्रयत्न आपण करतो का. मला तर ती मधमाशी इवली जेम्स बाँड वाटली. तिच्या अथक प्रयत्नशीलतेकडे पाहिले तर भल्या भल्या आळशी माणसांचा आळस चुटकीसरशी कुठल्याकुठे पळून जाईल. पण आळशी माणूस डोळे उघडे ठेवून अशा प्रेरक क्षणांकडे पाहिल तर ना.
लाॅकडाऊनमध्ये आळसवलेल्या माझ्या सारख्या पामराला त्या इवल्या मधमाशीने अक्षरशः थक्क करुन सोडले. कितीतरी वेळाने मी पुन्हा पुन्हा गॅलरीत जाऊन पहात होतो पण त्या मधमाशीने आपले प्रयत्न सोडलेले नव्हते. प्रदीर्घ काळ प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याचे तिचे सामर्थ्य व चिकाटी यांना सलाम केलाच पाहिजे.
@विलास आनंदा कुडके
26/5/2021नाशिकरोड.
खूपच छान
उत्तर द्याहटवामनापासून धन्यवाद
हटवा