गप्पागोष्टी

 #प्रसंगी अखंडित गप्पा मारित जावे


   जहाज जोपर्यंत समुद्राचे पाणी आत घेत नाही तोपर्यंत ते बुडूच शकत नाही. इतका सुंदर विचार मी डोळे मिटून ऐकत असलेल्या गप्पांमधून ऐकला. एक मोटारमन आपल्या मित्राला सांगत होता. दुनिया मला चांगले म्हणाली तर मला आनंद होत नाही आणि वाईट म्हटली तर मी ते मनाला लावूनच घेत नाही. त्यापलिकडे मी गेलो आहे. ज्यांनी मला वाईट म्हटले शिव्या दिल्या तेच महिना दोन महिन्याने मला साॅरी म्हणत आले. ऐकतच रहावे असे त्याचे बोलणे होते

        पश्चिम लाईनवर तो विरारवरुन लोकल चालवतो आणि सेंट्रल लाईनला राहतो अशी माहिती कळाली. ट्रेन लेट का चालतात. दोन्ही रुट्स कसे वेगळे आहेत. रेल्वे सर्व सुविधा द्यायला तयार आहेत पण लोक कसे सुविधांची नासधूस करतात. चोरी करतात. एकेक चाक 45 हजाराचे असते. पेंटाग्राफ लाखाचा असतो. जगात एवढा स्वस्त प्रवास फक्त भारतीय रेल्वेत कसा करता येतो. दिवसांतून किती वेळा चेन खेचली जाते कितीतरी विषय ज्यांना आपला स्पर्शही झालेला नसतो ते एकेक विषय त्या गप्पांमधून उलगडत गेले.

         गप्पा ऐकणेही आनंददायी असू शकते. शेअर मार्केट राजकारण यावरील गप्पांमधून तर उलट सुलट इतक्या गप्पा रंगत राहतात. एकेक नेता. तो कुठे कमी पडला. कोणी काय केले. उद्याचे चित्र काय राहिल. अगदी मजा येते ऐकण्यात. कोणी म्हणेल अशी राजकारणावर गप्पा मारुन काही फरक पडेल का. फरक पडणार नसला तरी एक जागरुक दृष्टीकोन नक्कीच विकसित होत रहातो यात शंकाच नाही.

          क्रिकेटवरील गप्पा सुरु झाल्या की आपले अज्ञान लक्षात येऊन गप्प बसायला होते. लोक किती रस घेऊन एवढे सगळे कसे लक्षात ठेवतात याचाच अचंबा वाटत राहतो.

   जो ज्या क्षेत्रातील आहे त्या क्षेत्रातील त्याचे अनुभव, ज्ञान, किस्से यांचे अद्भुत भांडारच गप्पांच्या ओघात आपल्याला लाभत रहाते आणि आपल्या विचारांच्या कक्षा नकळत रुंदावत रहातात.

    काही माणसे इतकी बहुश्रुत असतात की कोणत्याही विषयावरील गप्पा रंगो त्या विषयावरील त्यांचे अगाध ज्ञान प्रकट होत रहाते.

      काही माणसे मोठमोठ्या गप्पा हाणत असतात. बोलबच्चनच. त्यांनी बोलायला सुरुवात केली की सगळे अटकळच बांधतात की आता हा निव्वळ फेकाफेकी करील. पण अशा गप्पांमध्येही सगळे रंगून जातात. कारण अशा गप्पांमधून इतका छान वेळ निघून जातो की विचारता सोय नाही.

     गप्पांमधून मधे मधे जोक किस्से सांगणारे एक वेगळाच रंग भरत असतात. यामुळेच गप्पांना महफिलीचे रुप प्राप्त होत रहाते.

@#विलास आनंदा कुडके

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अण्णा

कविता

किसलय - रमेश वाबगावकर