आईच्या आठवणी3

 #आईच्या आठवणी

       काळाच्या ओघात आपण किती पुढे आलेलो असतो. एकेक गोष्ट जशी निसटत गेलेली आठवते. कोणी म्हणतं कशाला पाहिजे आता आठवणी. जे गेले ते काय परत येणार तर नाही. पण जेव्हा जिव्हाळाचा ओलावा कुठे दिसेनासा होतो. गरजेपुरती कोरडी नाती उरतात. प्रत्येक गोष्टीचा व्यवहार होऊन जातो. देणे घेणे मोजून मापून होते. मनाजोगते झाले नाही की सहज कुठलेही नाते संपून जाते. सगळे मिळूनही रसच मिळत नाही. सगळ्या गुंत्यात राहूनही एकटेपण शिल्लकच राहते. अशावेळी निसटलेल्या क्षणांच्या आठवणी मनावर शांत शिडकावा करतात

           गाय दी मोपासा यांची नेकलेस कथा वाचता वाचता अचानक मला आईच्या नेकलेसची आठवण झाली. आईला त्या काळात एखादा नेकलेस असावा अशी फार मोठी मनीषा होती. तेव्हा सोनेही आजच्या इतके महाग नव्हते. सोन्याची हौस असलेली आई स्वयंपाक घरात पाण्याची भांडी ठेवायच्या ठिकाणी कोणाला दिसणार नाही अशा रीतीने ठेवलेल्या गाडग्यात घरखर्चासाठी मिळालेल्या तुटपुंज्या पैशातून बचत करुन पितळी पै एकेक करुन साठवायची. नागचौकात एक सोनाराचे दुकान होते. तिथे मैत्रिणीला घेऊन साठवलेल्या पितळी पयांतून तिने पाटल्या करुन घेतल्या होत्या. त्या हुबेहुब सोन्याच्या वाटायच्या. बचत करायच्या सवयीतून तिने कितीतरी वर्षांनी सराफ बाजारात जाऊन अडीच तोळ्याचा सोन्याचा नेकलेस बनवून घेतला. नेकलेस घरी आणल्यावर तो तिला कधी एकदा सगळ्यांना दाखवते असे झाले. भोईरवाड्यात आजीला नेकलेस दाखवला तेव्हा आजी खूप खुश झाली. या लेकीचे तिला खूप कौतुक वाटले. मावशांनीही तो नेकलेस पाहिला. सगळ्यांचेच डोळे तो नेकलेस पाहून चमकले. आई मग अभिमानाने सगळ्यांमध्ये खुशीत वावरत राहिली.  

   जंबुसरची मावशी नाशिकला आली. तिलाही तो नेकलेस इतका आवडला की जंबूसरला गेली की पैसे पाठवीन पण हा नेकलेस मला दे असा तगादा तिने आईकडे लावला. पण आईने स्वतः करिता इतक्या वर्षांनी पै पै साठवून मोठ्या कष्टाने केलेला पहिलाच दागिना काय असा कोणाला देऊन टाकण्यासाठी थोडाच बनवला होता. बरं परत असा दागिना करायला किती काळ लागला असता. आईने नेकलेस दिला नाही म्हणून मावशी रागारागाने जंबुसरला निघून गेली. माझ्या घरी बहुबधं आहे असे ती म्हणतच गेली. त्यानंतर दोघी बहिणी कितीतरी वर्षे पुन्हा भेटल्या नाही की बोलल्या नाही.

           आईला तेव्हा लग्न जुळविण्याची खूप हौस. भागापूरच्या एका चुलत भावासाठी तिने नाशिकमधील एक मावसबहीण पाहिली. सगळा पुढाकार घेतला. लग्न जमले. बस्त्यासाठी भागापूरवरुन तिची मामा कंपनी आली. सराफ बाजारात सगळे बस्त्यासाठी गेले. भरपूर खरेदी झाली आणि दुकानदाराला द्यायला ७०० रुपये कमी पडले. पैसे कसे उभे करायचे प्रश्न पडला. एका मामाची नजर आईच्या नेकलेसवर गेली. नेकलेस गहाण ठेवून ७०० रुपये चुकते करुन बस्ता पूर्ण करता येईल. भागापूरला गेले की ७०० रुपये पाठवून देऊ असे सांगून मामाकंपनींनी आईला नेकलेस गहाण ठेवायला भागच पाडले. हो ना करता आईने गळ्यातला नेकलेस काढून जिथे घडवला होता तिथे गहाण ठेवला आणि बस्त्यासाठी कमी पडलेले ७०० रुपये उभे करुन दिले. मामांच्या ८१ एकर जमीनीत केळीच्या बागा होत्या. त्यामुळे आपले पैसे मिळतील तेव्हा दागिना सोडवून घेऊ या विचाराने आई तेव्हा नेकलेस गहाण ठेवायला तयार झाली होती. लग्न झालं. पण ज्याचं लग्न जमवलं तो दारुच्या व्यसनात पार कामातून गेला. पुढे तिची मावस बहीण भागापूरवरुन दोन मुलींना घेऊन नाशिकला आली. मामा कंपनी आज पैसे पाठवतो उद्या पैसे पाठवतो असे करीत करीत त्यांनी शेवटपर्यंत  पैसे परत पाठवलेच नाही. ही गोष्ट आईच्या फार जिव्हारी लागली. त्यातच तिला कर्करोगाने ग्रासले. त्यातच ती गेली. तेव्हा परिस्थिती अशी होती की वडीलांनाही तो दागिना सोडविता आला नाही. अशी ही आईने हौसेने केलेल्या नेकलेसची गोष्ट आठवली की डोळे पाणवत राहतात.@विलास आनंदा कुडके 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अण्णा

कविता

किसलय - रमेश वाबगावकर