आईच्या आठवणी2

 #आईच्या आठवणी

       आईबरोबर कुठे बाहेरगावी जायचं म्हणजे मोठी मौज असायची. आई कधी भागापूरला आजोळी तर कधी नंदूरबारला तिच्या आईकडे मला घेऊन जायची. कधी गुजरातमध्ये जंबूसरला तिच्या बहिणीकडेही घेऊन जायची. प्रवासाला निघायचे म्हणजे ती भरपूर गुळाच्या दशम्या करायची आणि वर शेंगदाण्याची चटणी. पाण्याचा पितळी फिरकीचा तांब्या असायचा. एसटीत मला मांडीवर घेऊन बसली की मी खिडकीतून बाहेर खाली पहायचो तर मला गाडी कशीकाय धावते याचा प्रश्न पडायचा कारण चाक कुठेच दिसायचे नाही. रेल्वेचे डबे तेव्हा गेरु रंगाचे असायचे आणि कोळशाचे शिट्ट्या मारणारे इंजिन असायचे. मी लहान असल्याने आई माझे तिकीट काढायची नाही तर मला बर्थवर घेऊन अशी झोपायची की येणाऱ्या जाणाऱ्याला मी अजिबात दिसायचो नाही. एकदा असेच नंदूरबारहून सुरतकडे रेल्वेने ती मला घेऊन निघाली. बरोबर मामा कंपनीही होती. आई मला नेहमीप्रमाणे घेऊन बर्थवर झोपली होती. गाडीत तिकीट चेकर आला त्याने सर्वांची तिकीटे चेक केले. बर्थवर झोपलेल्या आईचे तिकीट विचारले ते मामाने काढून दाखवले. तिकीट चेकर पुढे जाणार तोच मी कुतुहलाने उठून वाकून पाहायला लागलो 'काय ग पमा' म्हणालो. सारे माझ्या आईला पमा पमबाई म्हणायचे. तिचे नाव लक्ष्मीबाई होते पण तिच्या प्रेमळ स्वभावामुळे सर्व तिला प्रमिला म्हणायचे. सर्वांबरोबर मीही तिला पमा हाक मारायचो. आई म्हणून हाक मारावी म्हणून समजावून सांगितले तरी माझ्या तोंडात पमाच बसलेले. तर तिकीट चेकरने मला पाहिले. मला बोलताही येते हेही पाहिले आणि मग माझे तिकीट कुठे म्हणून विचारले. आईने सांगितले तो अडीच वर्षाचा आहे. पण तिकीट चेकरने काही ऐकले नाही. दंडाची पावती फाडावी लागली.आणखी एक प्रसंग आठवतो. गुजरात मध्ये जंबूसरला जायचे तर आईने बलसाड गाडी पकडली होती. बरोबर वडीलही होते. बलसाडला उतरल्यावर पुढे पुन्हा तिकीट काढायचे होते. वडीलांना तेथील गर्दीत ते काही जमतच नव्हते तर आईने तेवढ्या गर्दीत शिरुन भांडून गुजरातीत बोलून तिकीटे काढून आणली. आईबरोबर आजोळी गेलो की तिथे घरोघरी माझे मोठे कौतुक व्हायचे. माझ्या तोंडून 'बरका' हा शब्द ऐकला की मामा आजोबा कंपनी खुश व्हायची. काळ्या मामा. भुरया मामा मला अजून आठवतात. त्यांचे घराच्या ओसरीवर किरणामालाचे छोटसे दुकान होते आणि ब्राह्मणगाववरुन ते किरणामाल आणून ठेवायचे. गोळ्या बिस्कीटांच्या बरण्या ठेवलेल्या असायच्या त्यातून ते कितीतरी गोळ्या बिस्किटे मला द्यायचे. भागापूर सारख्या छोट्या गावात ते दुकान फार चालायचे. पाच पैशाच्या चहाच्या पॅकेटच्या माळा टांगलेल्या असायच्या. परत निघतांना माझ्या हातावर कोणी पितळी दहा वीस पैसे ठेवायचे ते मी गोल पत्र्याच्या डबीत ठेवून द्यायचो आणि खूप खाऊ घेऊ असे बेत आखायचो पण गाडीत बसले की आई ती डबी मी हरवेन म्हणून घेऊन टाकायची. अशा कितीतरी आठवणी.@विलास आनंदा कुडके

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अण्णा

कविता

किसलय - रमेश वाबगावकर