अँक्वेरियम
अँक्वेरियम
समुद्र एक योगी.. अथांग.. समाधिस्थ मुद्रेचा शांत शांत.. तो बराचवेळ भारावल्यागत ती मुद्रा पाहण्यात मग्न असा खिडकीशी उभा.. एकटाच.. स्वत:चेच प्रतिबिंब पाहत असल्याप्रमाणे!
`काय पाहताय एवढे? `
पाठीमागून हळूवार आवाज आला तशी त्याची ती भावसमाधि भंग पावली, तिने हळूच पाठीमागून त्याच्या खांद्याशी कपाळ टेकवले. ती लाडिकपणें पुटपुटली - `मी इथे असतांना, एवढं काय आहे त्या समुद्रात पाहण्यासारखे - `
`अं? कुठे काय? `हळूच तो तिला आपल्या बाहुत घेतो - `लाडके, या समुद्राची मुद्रा किती आल्हाददायक आहे नाही? `
`आणि माझी मुद्रा काही नाही वाटतं `तिचा त्रासिक स्वर.`तसं नाही गं - `त्याचे कसेबसे शब्द.
तो पूर्ण भानावर येतो. अजूनही समुद्राची झिंग त्याची डोक्यातून उतरलेली नसते. त्याची नजर खोलीत भिरभिरते. एकूणएक सुखाच्या प्रतिकृतीवरुन फिरत राहते. टेलिव्हिजन, फर्निचर, सिलिंग फँन, एसी, संगमरवरी पुतळे, भिंती, अँक्वेरियम, हिरवे पडदे आणि बाहुत विसावलेली ती..पावलांना सुखावणारे गालिचे. अभावितपणे तो उद्गारतो, `डार्लिंग - `
`हूं `ती अजूनही तशीच त्याच्या कुशीतील ऊबेनें स्थिरावलेली. खिडकीतून हळूवार झुळूका. हलणारे पडदे..
×××
सकाळ. मिठीतून केव्हाच निसटलेली ती. कुठल्याशा स्वप्नांच्या सुखात मिटलेल्या त्याच्या पापण्या.. अजूनही तशाच.. ती फुलदाणीतील फुले बदलते.. खिडक्यांचे पडदे सारुन सज्ज्यात उभी राहते.. समुद्र शांत शांत सभोवार पसरलेला.. ती कशानेंतरी स्वत:शीच खुदकन हसते... सज्ज्यातून मागे फिरते.. तो अजूनही बेडवर तसाच.. मग ती हळूच अँक्वेरियमपाशी जाऊन उभी राहते.. आक्टोपसची नांग्यांची वळवळ सुरुच असते. समुद्रफुले तळाशी.. त्यावरील शेवाळं सळसळत असते.. शंख शिंपल्यात काही वेडेवाकडे दगड.. ती बराचवेळ अँक्वेरियमकडे पहात राहते.. आज पाणी बदलायला हवे.. ती हळूच समुद्राच्या किनारयावरुन सुरईत पाणी घेऊन येते.. तो अजूनही बेडवर तसाच.. ती पाणी बदलते.. रंगबिरंगी माशांची झिगझिग पहात राहते...
`त्याला एवढे समुद्राचे आकर्षण का असावे? आकर्षण म्हणण्यापेक्षा वेडच.. आपल्याला तरी ह्या वेड्याचे आकर्षण का असावे? `ती त्या विचारांच्या तंद्रीतच उठते... उठलेच पाहिजे... आवरलेच पाहिजे.. ती बेडवर त्याच्या पायथ्याशी आरशाच्या पुढ्यात जाऊन बसते.. आपलं रुप न्याहाळत बसते.. गळ्यातला आपल्या रुपाला खुलून दिसणार्या कल्चर्ड मोत्याच्या हारावरुन तिचे वारंवार बोटे फिरत राहतात. पदर खाली ओघळवून ती आपले उठावाचे सौंदर्य पारखीत राहते.. गुलाबी छटेच्या गालावर काळ्याभोर डोळ्यांची लवलव निरखित राहते.. आणि मग भुवया कोरता कोरता एकवार आरशातून ती त्याच्या निद्रिस्त चेहर्याकडे पहात राहते.. एकटक.. दाढी फुलारलेली.. त्यातून घट्ट मिटलेले ओठ.. मिटले डोळे.. पांघरुणात अस्ताव्यस्त पसरलेले सुखासीन शरीर.. ती सुखावते.. उठवावं का? पण नको.. त्याच्या मिटल्या पापणीत अवतीर्ण झालेल्या स्वप्नांची साखळी यावेळी आपल्या हातून तुटता कामा नये.. तो अशातही किती आकर्षक दिसतो.. ती उठते.. पुन्हा सज्ज्यात जाऊन समोर सभोवार पसरलेला समुद्र न्याहाळत राहते.. एकटक.. ***
रात्री अचानक कानाशी घोंगावणारया आवाजाने ती खडबडून जागी होते.. उठून पाहते तो उघड्या खिडकीत हलणारे पडदे आणि काळोख याशिवाय काहीही नसते. मग हा असा भास का व्हावा? ती बेडवर पडल्यापडल्याच हात लांबवून स्वीच आँन करते.. मंद प्रकाशात काहीही हालचाल नसते.. सगळे जिथल्यातिथे.. स्तब्ध.. फक्त घड्याळाची टिकटिक.. अँक्वेरियममधील आक्टोपसची वळवळ.. मासोळ्यांची झिगझिग.. निळेशार पाणी.. बाकी काहीही नाही. मग हा आवाज कसला.. की भास? ती हळूच पापणी मिटते.. सवयीने हात जवळ टाकायला जाते आणि ती दचकते.. तो बेडवर नसतो.... ती घाईघाईने उठते... खोलीभर भिरभिरत्या नजरेने शोध घेते.. पण तो कुठेही असल्याचे जाणवत नाही.. कुठे गेला असेल तो.. हाक मारावी का? पण नकोच.. तो इथेच असेल कदाचित.. इथेच सज्ज्यात.. समुद्राकडे पहात.. पण तिला चैन पडत नाही.. ती उठते.. पांघरुन सारुन.. घाईघाईने सज्ज्यात येते पण तो तिथेही नसतो.. आता मात्र ती दचकते.. आज तो प्रथमच असा कुठेतरी निघून गेलेला होता. पंधरा दिवसांपूर्वी आपलं लग्न झालं.. तेव्हापासून तो एकदाही माझ्यापासून विलग झालेला नव्हता.. मग आज असा अचानक कुठे गेला असेल तो? ती घाईघाईने सज्ज्यातून पाठीमागे वळते.. वळता वळता तिला जाणवते पौर्णिमेचे मोठ्ठे चंद्रबिंब समोर वरवर चढत होते.. ती दारापर्यंत जाते पण दार बाहेरुन कुणीतरी लावून घेतलेले.. आतामात्र ती उभी घाबरते.. निर्जीव फर्निचर.. निर्जीव पुतळे.. फक्त अँक्वेरियममध्ये वळवळणारया आक्टोपस व झिगझिगणारया मासोळ्यांशिवाय बाकी सर्व निर्जीव.. आणि विलक्षण एकटे एकटेपणा.. कुठे गेला असेल हा अशा अपरात्री मला एकटीला टाकून.. ती पुन्हा बेडवर अंथरुणात शिरुन छताकडे पहात विचार करीत राहते.. डोळे मिटते.. पुन्हा जोरदार घोंघावत उफाळून येणारा लाटांचा आवाज कानावर आदळत राहतो.. आता मात्र तिला असह्य होते.. ती डोळे उघडून पाहते.. खिडकीतून चंद्रप्रकाशाची तिरीप आत आलेली असते.. अचानक कुठेतरी काच तडकून फरशीवर पडून फुटल्याचा आवाज.. ती जागीच उठून बसते.. विस्फारून पाहते.. प्रचंड आवेगात यावं तसं अँक्वेरियममधून पाण्याची एकेक लाट झेपावत बाहेर पडत होती.. उध्वस्त अँक्वेरियममधून ओसांडणारया लाटांनी पाण्याने सबंध खोली भरुन चाललेली.. जिकडे तिकडे घोंघावणारे उसळते फेसाळते पाणीच पाणी.. आणि चंद्र कवडशाच्या तिरीपित तिने पाहिले... एकेक मासोळी सळसळत नाचत होती.. बेडच्या पायथ्याशी गालिच्यावर दगडफुलांचे बेट माजले होते.. बेडवर सर्वदूर शेवाळ पसरलेले.. हिरवकंच शेवाळ.. काळेशार शेवाळ.. श्वास थांबला होता.. तिला ते जाणवत होते.. अचानक जेव्हा कोपरयातील अंधारातून प्रचंड वळवळणारया नांग्यांचे धूड बेडच्या दिशेने येताना तिने पाहिले तेव्हा ती किंचाळली.. भितीने थरथरु लागली... तो आक्टोपस होता.. थंडगार गिळगिळीत नांग्यांनी जेव्हा तो तिला कुरवाळू लागला तेव्हा तिला प्रचंड शिसारी आली.. ती त्याच्या विळख्यातून सुटण्याची विलक्षण धडपड करत होती पण ती पकड घट्ट होती.. रात्रभर ती त्या वळवळणारया आक्टोपसच्या मिठीत सुटकेसाठी धडपडत होती.. अखेर थांबलेल्या श्वासातच ती बेडवर बेशुद्ध कोसळली...
***
कुणीतरी हलवून हलवून उठवत असल्याचं तिला जाणवलं. विलक्षण थकव्याने पापण्यासुद्धा जडावलेल्या.. तिचे ओठ हलतात.. खिडकीतून झुळूक सरकावी तसे शब्द तिच्या घशातून अस्पष्ट निघून गेले.. `कोण? `
`डार्लिंग `, त्याचा परिचित पुरुषी आवाज.. त्या आवाजाने ती झटकन डोळे उघडते.
`.... कुठे गेला होता रे मला एकटीला सोडून शी काय ओंगळवाणा.. भितीदायक... `
`अगं असं काय करतेय, रात्रभर मी जागा होतो... पण तू.. पंधरा दिवसातच आटोपलं आपलं? `
`म्हणजे मी - `ती नजरेनेंच खोलीचा कोपरांकोपरा चाचपून पहाते.. सगळं जिथल्यातिथे.. बेडवरुन हात फिरवून पहाते... खिडकीचे पडदेही तसेच हलते.. आणि विशेष म्हणजे खिडकीशी असलेला अँक्वेरियमही तसाच.. आक्टोपसही तसाच.. मग रात्री घडलं ते? भास? ती हळुच हसते.. ती त्याच्या कुशीत शिरुन हसते.. तो विचित्र नजरेने खिडकीतून पलीकडे दिसणारया आकाशाच्या तुकड्याकडे पहात राहतो.. का कुणास ठाऊक त्याला त्या चौकोनी खिडकीची अनामिक भिती वाटू लागते.. पौर्णिमेच्या चंद्राची भिती वाटू लागते... त्याने तिला खोटंच सांगितलं होतं, `रात्रभर मी जागा होतो... `खोटं होतं सगळं...
खरं एवढंच होतं की तो आता तो राहीलाच नव्हता आणि अँक्वेरियम हे अँक्वेरियम नव्हतेच मुळी तो कोंडून ठेवलेला समुद्राचा म्हणजे त्याचाच आत्मा होता आणि त्याला पुन्हा चिंता पडली होती ती येणारया पौर्णिमेची.............!
@विलास आनंदा कुडके
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा