दोन प्रेमाचे शब्द


        

          जगात सर्वात महाग असतील तर ते फक्त दोन प्रेमाचे शब्द. सर्व मिळेल पण दोन प्रेमाचे शब्द मिळणार नाही. हे शब्द असतात तरी कोठे. प्रत्येकाच्याच अंत:करणात पण ते ओठांवर कधी येत नाहीत. कदाचित ओठांवर येण्यासाठी महत्प्रयास पडत असावे. शक्यतो प्रेमाचे दोन शब्द जो तो ओठांवर येऊच देत नाही. कुठेतरी खोल काटेरी कुंपणात कैद करुन ठेवतो असले भावूक हळवे शब्द. असे असले तरी प्रत्येकाला या शब्दांची अपेक्षा असते मात्र दुसऱ्याकडून. पण ही अपेक्षा सहसा पूर्ण होत नाही. जोपर्यंत अंत:करण हिशेबी स्वार्थी व्यावहारिकतेने भरलेले असते. प्रेमाच्या शब्दांची अपेक्षाच करायला नको.

          प्रत्येकाच्या वाट्याला कटू अनुभव येत जातात आणि ओठांवर कडवटपणा येत राहतो. अशामध्ये अंत:करणातील शब्द येतील कोठून. असे शब्द खर्चावे असेही आयुष्यात कोणी भेटत नाही. खूप आठवून पाहिले तर आयुष्यात आई वडील बहिण यांच्याव्यतिरिक्त कोणाहीकडून आपण प्रेमाचे शब्द ऐकलेले नाहीत असे लक्षात येईल. मला माझी आत्या ज्या कळवळ्याने ईलास म्हणायची तशी हाक नंतरच्या आयुष्यात कोणीही मारली नाही.

          उंबरयाबाहेर पाऊल टाकले तर समंजस व्यवहारिक शब्दांशी सामना करावा लागतो. कोरड्या शब्दांमध्ये सगळे व्यवहार पार पाडले जातात. वाळवंटात हिरवळ दिसू नये तशी मनाची अवस्था असते. मन आक्रंदत राहते. प्रेमाच्या दोन शब्दांसाठी भुकेले होऊन जाते. पण तो दिलासा मिळतच नाही.

          जिथे प्रेम आहे असे वाटते तिथेही भ्रमनिरास होत राहतो. केव्हाही तुटू शकतील अशी नाती आपल्या वाट्याला येत राहतात आणि मग त्यांच्या जपवणुकीमध्ये रात्रंदिवस काळजी घेण्यामध्ये जो तो राहतो. दोन प्रेमाचे शब्द जिथून अपेक्षित असतात तिथे अशी काळजी घेणे सुरु होते.

           काहीवेळा अशी नाती जपण्यात कुठेतरी कमी पडल्यावर ओघ आटून जातो आणि निव्वळ कोरडेपणा केव्हा सुरु होतो हे आपल्या लक्षातही येत नाही. मग उशीरा लक्षात येते की जे काही होते ते खरे नव्हते. गरजेपुरते होते. गरज उरली नाही म्हटल्यावर सर्व काही सरले आहे अशा विदारक अनुभवाला सामोरे जावे लागते. आयुष्य संपत येते तरी दोन प्रेमाच्या शब्दापासून वंचितच रहावे लागते. या शब्दांशिवाय आयुष्य सरुन जाते. आयुष्य ओघळून रिक्त हस्त राहिल्याची जाणीव छळतच राहते. अंत:करणात असूनही या दोन प्रेमाच्या शब्दांची देवाणघेवाण होतच नाही..@विलास आनंदा कुडके

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गप्पागोष्टी

कविता

शुभेच्छा