आठवणींची फुलपाखरे

 #आठवणींची फुलपाखरे

मन निवांत होते. क्षणभरच. या निवांतपणाच्या क्षणांच्या फुलांवर अलगद आठवणीचे एकेक फुलपाखरु बसून जाते.. त्यांच्या रंगबिरंगी पंखांवर मन मागे मागे जात रहाते... आज मला अचानक मित्राच्या आईची आठवण आली. मला आठवते तेव्हा मी तीन वर्षांचा गॅप घेऊन रायते सरांनी पुन्हा शिकायची प्रेरणा दिल्यावर विज्ञानाची आवड बाजूला ठेवून वाणिज्य शाखेत अकरावीला के टी एच एम काॅलेजमध्ये १९८० मध्ये प्रवेश घेतला. तेव्हा मी नाशिकमध्ये मेनरोडला रेडिमेड कपड्याच्या दुकानात हेल्पर म्हणून कामाला होतो. सकाळी साडेआठ ते रात्री साडेआठ अशी ड्युटी असायची. दुपारी दोन तास जेवणाची सुट्टी. काॅलेजला जायचे तर मी मालकाला म्हटले ही दोन तासांची सुट्टी मला सकाळी द्या. मालक तयार झाले. झाले. सकाळी दहापर्यंतचे पिरियड कसेबसे अटेंड करुन मी साडेदहाला दुकानात जाई. काॅलेजमध्ये खराडे आणि सातपुते हे दोन मित्र मिळाले. वर्गात हमीद इनामदार हा मित्र खूप छान गाणे म्हणायचा. त्याने एकदा माझे नाव उर्दूमध्ये कसे लिहितात ते वहीवर काढून दाखवले होते. मला उर्दू शिकव असेही मी त्याला म्हणायचो. गुलाम अली यांनी गायलेल्या कितीतरी गझला त्याला तोंडपाठ होत्या. चुपके चुपके.. हंगामा है क्युं वरपा.. कितीतरी गझला मी त्याच्याकडून लिहून घेतल्या. साजिद अफजल हे देखील असेच जीवलग मित्र. खराडे यांची ल्युना होती. बारीक अंगकाठी. बोलके डोळे. त्याचे मेनरोडला काॅस्मेटीक ज्वेलरीचं दुकान सुरती फरसाणवाल्याच्या बाजूला. त्याच्या घरी रविवार कारंजावर मी नेहमी जात असे. माझ्याविषयी खराडे यांनी बहुधा त्याच्या आईला सांगितलेले असावे. मी जेव्हा खराडे यांच्या घरी जायचो त्या हमखास मला जेवू घालायच्या. मी लाजत लाजत त्यांच्या आग्रहाखातर जेवायचो. त्यावेळी त्या काय करायच्या माझ्या ताटातील भाजी संपत आली की पोळी वाढायच्या आणि पोळी संपत आली की भाजी वाढायच्या. अगदी पोटभरुन जेवू घालायच्या. त्यावेळी मला माझ्या आईची प्रकर्षाने आठवण होत रहायची आणि डोळे भरुन यायचे. हा माझा मित्र खराडे अमरनाथ यात्रेत गेलेला असताना सोडून गेला. कितीतरी दिवसांनी आज हे आठवतेय आणि डोळे भरुन येत आहेत.. विलास कुडके

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अण्णा

कविता

किसलय - रमेश वाबगावकर