आईच्या आठवणी
#आईच्या आठवणी मला आठवते मी खूप लहान असेन. आईच्या सारखे मागे मागे असायचो. मला सोडून आईने काहीच करु नये असे वाटायचे. आईला कामही करता यायचे नाही. रडून रडून आईचा मी अगदी पिच्छा पुरवायचो मग ती वैतागून अस्सा काही रट्टा ठेवून द्यायची की मी मुसमुसत आईशी बोलायचेच नाही असे ठरवून खिडकीत जाऊन बसायचो. आई मग कामात लागे. कामाच्या नादात ती मला विसरुनही जायची. बरे कामेही खूप असायची. सकाळी खाली उतरुन सार्वजनिक नळावरुन हंडे कळशा भरुन आणायच्या असे. तांब्याचा बंब पेटवून पाणी गरम करायचे असे. दारावर आलेल्या मोळीवालीकडून लाकडाची मोळी घेणे. ती मधल्या अंधारया खोलीत बल्ब लावून रचून घेणे. सकाळची झाडझूड. दार लावून आंघोळ. नववारी नेसणे. घडीच्या आरसापेटीपुढे बसून केसांचा अंबाडा घालणे. कुंकू रेखणे. जर्मलच्या पातेल्यात धुणे आणि धोपाटणे घेऊन घरात मला ठेवून बाहेरुन कडी लावून 'आले बरका.. घरातच खेळ' सांगून गंगेवर (गोदाकाठी) धुणे धुवायला जाणे. बाजारातून पिशवीत गहू आणणे. निवडणे. कितीतरी कामे. एकदा मी असाच रुसून खिडकीत बसून राहिलो. बघत राहिलो. आई कधी कामातून माझ्याकडे बघते व समजूत काढते. पण कसच...