तिच्या हदयाची हांक - एच. ई. बेटस                                   वसंत ऋतू सुरु झाला होता. अशावेळी लिलिअन जाॅर्डनच्या लक्षांत आले की आपण प्रेमात सापडलो आहोत. असं काहीसं व्हावं अशी तिची इच्छा नव्हती, परंतु हॅरी ट्रॅव्हस नावाच्या एका पुरुषावर ती प्रेम करु लागली होती खरी. त्याच्यावर आपलं प्रेम जडलं याचं कारण काय असावं म्हणून ती कधी कधी स्वत:शी विचार करीत बसे. पण तिला काही आपल्या प्रेमाचं कारण निश्चित करता येत नसे. मग तिला वाटू लागे हॅरी ट्रॅव्हर्सचा एक पाय खोटा-लाकडाचा आहे म्हणूनच आपलं प्रेम त्याच्यावर बसलं की काय कुणास ठाऊक?                                   या सुमारास ती एका फॅक्टरीतल्या नोकरीवर होती. जराशा उभट चेहर्‍याची, पिंगट तकतकीत वर्णाची, स्वभावानं फार धीट आणि फार मायाळू. आपल्या मनातल्या गोष्टी सहसा तोंडावाटे न काढणारी अशी लिलिअन ही एक तरुण मुलगी होती. तिच्या पिंगट डोळ्यांच्या नजरेत प्रेमळपण ओतप्रोत भरलेला होता, व दुसर्‍या माणसावर मुग्धपणानं विश्वास टाकण्याची तिची वृत्तीहि स्पष्ट दिसत असे. लिलिअन ज्या फॅक्टरीत काम करीत असे तिथेच आर्थर आॅस्टिन नावाचा एक तरुणहि कामावर होता. त्याच्या चेहऱ्यावर पुरळ उठलेलं होतं. ती ज्या खोलीत काम करीत असे तिथे तो वरचेवर येई, आणि ती खोलीत नसली की तिच्या टेबलावर हळूच चोरुन चिठ्ठी ठेवून जाई. आॅस्टिनच्या या वागण्याची थट्टा करुन लिलिअन हसे. आपल्याप्रमाणे तोहि बिचारा प्रेमात सापडला असेल अशी तिला कधी कल्पना आली नाही.                                        तिची ट्रॅव्हर्सची गाठ पडण्यापूर्वी एके दिवशी दुपारी आॅस्टिननं तिला आपल्याबरोबर जेवायला चलण्याचा आग्रह केला म्हणून ती त्याच्याबरोबर गेली. कोपर्‍यावरच्या छोट्याशा दुकानात जाऊन दोघांनी जेवण केलं. आॅस्टिनचं लक्ष खाण्याकडे नव्हतं हे प्रथम तिच्या काही ध्यानात आलं नाही. परंतु जेवणाचा मुख्य भाग संपून टेबलावर 'पुडींग' आलं तेव्हा तिनं आॅस्टिनकडे पाहिलं तो त्याच्या फिकट किरमिजी रंगाच्या डोळ्यात अश्रू आले होते. ते पाहून मात्र तिला वाटलं आता ही स्वारी आपलं प्रेम बोलून दाखविणार. जणू आपल्या लक्षात काहीच आलेलं नाही असं सोंग करुन ती काही वेळ 'पुडिंग' खात राहिली. खरं म्हणजे त्याच्याकडे पहाणंदेखील नको असं तिला झालं होतं. त्याचा तो पुटकुळ्यांनी भरलेला घाबरट चेहरा, जे प्रेम त्याला अन्यतर्‍हेने  प्रदर्शित करता येत नव्हतं त्याप्रेमानं पाणावलेले त्याचे डोळे, आणि पुढ्यातलं पुडिंग खाण्याऐवजी उगीच घाबरट हालचाल करणारे त्याचे तांबुस हाडकुळे हात, या गोष्टी तिला अगदी दृष्टीसमोर नकोशा वाटल्या.                                                                             मग एकदम आॅस्टीनला वाचा फुटली, आणि तिच्याविषयीच्या आपल्या भावना तो बोलून दाखवू लागला. मोठ्या आवेगानं तो बोलत होता,आणि त्यामुळे त्याचे शब्द एकमेकात गुंतून अडखळत होते, परंतु लिलिअनचं अंत:करण त्या शब्दांनी विरघळण्याऐवजी थंडगार राहिलं होतं. तो तिला विचारु लागला,                                                                  'कधी मधी तू माझ्याबरोबर येऊ शकणार नाहीस काय? फिरायला म्हण, किंवा सिनेमा बघायला म्हण. मला माहित आहे, की मी सामान्य आहे. अगदीच सामान्य आहे. परंतु माझ्याबरोबर एखाद्या वेळी यायला काही हरकत नाही. येशील?'                                                                         शेवटी त्याचं बोलणं संपविण्यासाठी तिनं उत्तर दिलं, 'छे छे, मला येतां येणार नाही. रागावूं नका. पण येणं शक्य नाही मला.'                                                                             'का नाही? कृपा करुन सांग. कां नाही?' असं विचारताना तो आपल्या सरळ काळ्या केसांवरुन आपला पंजा सारखा फिरवीत होता. जणू असं काही केलं की आपल्या विचारण्यात अधिक निश्चय आणि करारीपण तिला वाटेल अशी त्याची कल्पना होती. त्यानं आणखी एकदा  विचारलं, 'सांग तरी, का नाही?'                                                                              तिनं कांहीच उत्तर दिलं नाही.                                            पुन्हा आपला पंजा केसांवरुन दाबून फिरवीत त्यानं  विचारलं, 'कृपा करुन सांग की, कां नाही? काय कारण असेल ते सरळ सांगून टाक. मी तुला आवडत नाही?'                 ती म्हणाली, 'नाही'                                                         'पण का नाही? का आवडत नाही मी तुला? सांग ना, सरळ सांगून टाक. मी दिसायला चांगला नाही म्हणून होय?'                   हे संभाषण संपविण्यासाठी काही तरी सांगून टाकलंच पाहिजे असा विचार करुन तिनं उत्तर दिलं, 'अं.... कुणास ठाऊक!' पण मग नंतर त्याच्या फिकट आरोग्यशून्य चेहर्‍याकडे सरळ नजर रोखून ती म्हणाली, 'तुम्ही पुरेसा व्यायाम कां नाहीघेत?'                                                        'हेच काय तुझ्या नकाराचं खरं कारण?' तो म्हणाला, 'एवढंच - एवढंच वाटतं तुला?'                                              ती म्हणाली, 'हं. मला वाटतं ते तुम्हाला सांगितलं. तुम्ही अगदी व्यायाम घेत नाही. सिनेमा फार पहातां तुम्ही.' आपण जे बोलतो त्याबद्दल आपली अगदी खात्री आहे असं त्याला वाटावंम्हणून ती अधिकच आवेशानं बोलू लागली, 'तुम्हीमिठाई फार खाता. सिगारेट्स फार ओढता. आपल्या शरीराची - आरोग्याची - अगदी काळजी घेत नाही तुम्ही....'                      तिचंबोलणं संपण्यापूर्वीच आॅस्टिन एकदम उठला व हाॅटेलातून बाहेर पडला!                                                       या प्रकारानंतर लिलिअन दुपारच्या जेवणासाठी या हाॅटेलात एकटीच जाऊ लागली. आॅस्टिननं तिच्याशी बोलणं सोडून दिलं. आठ दहा दिवसानंतर तिला कुणीसं सांगितलं की तो फॅक्टरीतली नोकरीहि सोडून निघून गेला. कां आणि कुठे ते कुणालाच माहित नव्हतं. आता वसंत ऋतु नुकताच सुरु झाला होता.लिलिअन हाॅटेलमध्ये बसल्या बसल्या बाहेर पाही. तेव्हा सूर्यप्रकाशानं चमकणारया वृक्षशाखांना घासून जाणारं धुकं तिला दिसे ते अगदी नाजुक आणि कधी हिरवं तर कधी 'आॅलिव्ह' रंगाचं आणि कधी कधी जवळ जवळ पिवळं असे. बाहेरच्याप्रदेशातल्या बागेबागेतून 'लिलॅक' च्या झाडावर काळसर तांबड्या रंगाच्या कळ्या फुटल्या होत्या ;आणि हाॅटेलच्या खिडक्यांतून ठेवलेल्या 'डॅफोडिल' ची रोपटी फुलांनी बहरुन सूर्यप्रकाशात हालत होती. त्याकडे पाहून आॅस्टिनची आठवण करतां करतां तिला वाटे, आपण त्याच्याशी तसं बोललो ते जरा मूर्खपणाचंच झालं. मूर्खपणाचं आणि ज्यांत कांही तथ्य नाही असं होतं ते आपलं बोलणं. कारण ती मनांतल्या मनात पुरतं जाणून होती की पुरुषाच्या आरोग्याशी अगर सुद्दृढतेशी प्रेमाचा काही एक संबंध नाही. स्री जेव्हा प्रेमाचा विचार करते तेव्हा त्याचं शरीर धडधाकट असलं पाहिजे एवढंच कां तिला हवं असतं? डॅफोडिल' च्या रोपट्याकडे पहांता पहांता आणि आॅस्टिनची आठवण करतां करतां लिलिअनला समजून आलं की तिला कांही केवळ पुरुषाच्या शरीराची सुदृढता पुरेशी वाटणार नव्हती, त्यापेक्षा अधिक कशाचीतरी तिच्या अंत:करणाला ओढ होती.                     नंतर थोड्याच दिवसांनी तिचं लक्ष ट्रॅव्हर्सकडे गेलं. अथवा ट्रॅव्हर्सचं लक्ष आपल्याकडेच असल्याचं तिच्या लक्षात आलं. तो सुमारे पसतीस वर्षांचा असावा.तो शरीरानं जरासा अवजडच होता. त्याची चर्या ममताळू होती. त्याचे केस पिंगट होते आणि ते एखाद्या झुपक्यासारखे त्याच्या डोक्यावर दिसत. त्याच्या वागण्यात आणि विचारात शिस्त आणि निश्चयीपणा असावा असा तिनं तर्क केला. कारण तो ठराविक दिवशींच हॉटेलात येई, आला की कोपर्‍यांतल्या एका ठराविक टेबलाशी बसे, आणि एका हातावर आपली हनुवटी अलगद टेकून मुळींसुध्दा हालचाल न करता आपले कांहीसे धुंद निळसर डोळे तिच्याकडे लावून तो कितीतरी वेळ पहात बसे. (क्रमश:) 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गप्पागोष्टी

कविता

शुभेच्छा