तिच्या हदयाची हांक
२.
एका शुक्रवारी तिच्या लक्षात आलं की तो आपल्या ठरीव जागी नव्हता. खिडकीबाहेर पाहिल्यावर झाडांच्या फांद्या एकदम वठलेल्या तिला दिसल्या असत्या तर तिला जसं वाटलं असतं तसंच तो आपल्या जागी नसल्यामुळे तिला वाटलं. ती हाॅटेलच्या बाहेर पडली तेव्हा जिकडे पहावं तिकडे उदासपणा भरलेला आहे असं तिला वाटलं, आणि शून्यपणाचीही जाणीव तिला असह्य झाली.
    पण ती रस्त्यावरच्या प्रकाशात आली तेव्हा एकदम ती जाणीव नाहीशी झाली. कारण ट्रॅव्हर्स तिच्याद्दृष्टीस पडला. एका जुन्या निळ्या रंगाच्या मोटारमध्ये तो बसलेला होता. का कुणास ठाऊक पण तिला एकदम वाटलं की तो आपलीच वाट पाहात आहे. तिचे पाय फरसबंद पायवाटेवर आपोआप थांबले, आणि ती थांबल्यावर तो तिच्याशी बोलला,
  'आपण नेहमी एकमेकांकडे पहातो तेव्हा मी विचार केला, की थोडा बदल म्हणून एकमेकांशी बोलावं तरी' त्यानं अगदी साधेपणानं म्हटलं.
  'हं' एवढंच ती म्हणाली. पण तिचं अंत:करण मित्रभावानं आणि आनंदानं भरलेलं होतं, आणि हदयात कोंडलेली कोणतीतरी भावना एकदाची मोकळी झाली असं तिला वाटलं.
  मग थोडा वेळ ती तशीच सूर्यप्रकाशात फरसबंद वाटेवर उभी राहून त्याच्याशी बोलत राहिली. हांकण्याच्या चाकावर त्याचे हात होते त्याकडे तिचं लक्ष गेलं. चांगले मजबूत मोठे हात होते ते. काबाडकष्ट करणाऱ्या पुरुषाचे असावे तसे. ज्याचे हात असे आहेत तो माणूस विचारी आणि निश्चयी स्वभावाचा असला पाहिजे असं तिला वाटलं. त्या हातांकडे पाहतांना नव्हे पण नंतर बरयाच वेळानं तिच्या लक्षात आलं की त्याच्या शरीराच्या मानानं त्याचे हात जरा जास्त मोठे होते.
   ती निरोप घेऊ लागली तेव्हा 'उद्या भेटशील कां?' म्हणून त्यानं विचारलं. तो म्हणाला, 'आपण मग गाडीत बसून जाऊ. मी कुठे राहतो ते तुला दाखवीन.'
  'कुठे राहातां तुम्ही?'
  तो म्हणाला, 'येथून बरंच लांब गेलं कीं एक नदी आहे. त्या नदीच्या काळापासून जवळच माझी वाडी आहे. ती नदी पाहिली आहेस का तू?'
  ती म्हणाली, 'नाही. गांव सोडून भोवतालचा प्रदेश मी कधी पाहिली नाही. तो पहावा अशी फार दिवस इच्छा आहे माझी.'
  दुसर्‍या दिवशी एक वाजतां ट्रॅव्हर्स तिला तिच्या फॅक्टरीच्या दाराशी भेटला. तो गाडीत बसला होता. त्यानं तिच्यासाठी दार उघडलं परंतु त्यानं ते गाडीतून न उतरताच उघडलं.त्यानं तिला विचारलं,
  'जेवायला जाऊ या काय कुठे तरी?'
 सुरु झालेल्या गाडीच्या थरथरणारया गिअरच्या दांड्यावरच्या त्याच्या मोठ्या हातांकडे पहात ती म्हणाली, 'मी थोडंसं खाल्लेलं आहे. मला भूक नाही.'
  मग गाडी निघालीआणि प्रकाशानं न्हालेल्या रस्त्यांतून जाऊ लागली. तो म्हणाला, 'आपण जर सरळ माझ्या वाडीवर गेलो तर तिसऱ्या प्रहरच्या चहाच्या वेळेच्या आंतच आपण पोंचू.'
 तिनं कांहीच उत्तर दिलं नाही. शांतपणे सारयाच गोष्टींचे बेत आधीं ठरविण्याच्या त्याच्या स्वभावाची कांही लक्षणं तिला याच्या आधीच दिसलेली होती. त्या स्वभावानुसार त्यानं तिला आपल्या वाडीवर नेण्याच्या बेताचे सारे तपशील ठरविल्यासारखे तिला दिसले. पण या क्षणी तिला जर मुख्यत: कशाची जाणीव असेल तर ती एकाच गोष्टीची. ती ही, कीं वेगानं निघालेली गाडी वसंत ऋतूला भेटण्यासाठी चाललेली आहे असा भासतिला होत होता. आभाळ स्वच्छ होतं. वारा मंदपणे वाहात होता. सूर्य सुस्तावल्यासारखा दिसत होता. 'बर्च' झाडांच्या नाजुक पातळ पानांतून सूर्याचीं किरणं खाली काळसर रंगाच्या 'ब्ल्यू बेल' फुलझाडांच्या अजून न फुलारलेल्या उभ्या दांड्यांवर पडून हेलकावे खात होती ;रस्त्याच्या कडेनं उगवलेल्या रानवट गवतांत, सोनेरी रंगाच्या 'हेझल' फुलवेलींच्या दाटीखाली, रस्त्याला अधिक अधिक जवळ येऊन भिडणारया जंगलाच्या झाडीत - जिकडे तिकडे सूर्यप्रकाश भरला होता, आणि त्यांतजागोजाग 'प्रिमरोझ फुलांचे छोटे छोटे ताटवे चकाकत होते. या सार्‍या शोभेकडे ती सारखी पहात राहिली. आपलं लक्षं ट्रॅव्हर्स कडे फारसं नाही हें तिच्या लक्षात आलं नाही. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गप्पागोष्टी

कविता

शुभेच्छा