तिच्या हदयाची हाक - एच. ई. बेटस
तिच्या हदयाची हाक - एच. ई. बेटस घरांत जाण्याऐवजी लिलियन म्हातारीला म्हणाली,' फुलं विकण्यात मी मदत करते तुम्हाला. मी बसते तुमच्याजवळ. 'हॅरी घरात गेला, आणि ती त्याच्या आईजवळ बसून राहिली. दुरुन एखादी गाडी येतांना दिसली की म्हातारी आणि ती' डॅफोडिल 'च्या कुंड्या उचलून दाखवीत. परंतु गाडी थांबत नसे. एखादी गाडी वेग कमी करुन सावकाश जाऊ लागे ;परंतु तिच्यातली माणसं क्षणभर' डॅफोडिल 'च्या फुलांकडे, त्या दोघीजणींकडे, आणि वाडीवरच्या पिवळ्या घराकडे बघितल्यासारखं करीत, आणि मग गाडी पुढे जाई. सारं वातावरण इतकं विलक्षण शांत होतं की शहरात राहाणाऱ्या लिलियनला ते मनाची चलबिचल करणारं वाटलं. जिकडून तिकडून फुलांचे आणि सूर्यकिरणांनी गुळचट झालेल्या गवतांचे गंध येत होते. वाडीमागच्याविस्तीर्ण शेतवाडी सूर्यतापानं झोपी गेल्यासारखी वाटत होती. म्हातारी लिलिअनशी मधून मधून बोलत होती. या बोलण्यात ट्रॅव्हर्सचा विषय सहजगत्याच निघाला, आणि त्याचा पाय कसा मोडला, त्याला कुठे नोकरी करणं अशक्य झाल्यामुळे म्हातारीनं आपल्याजवळची सारी माया कशी दिली, व मग ही वाडी खरेदी घेऊन इथे शेती - बागायती करीत तो व त्याची आई कशी राहू लागली, ती सारी हकीगत म्हातारीच्या बोलण्यात हलके हलके बाहेर पडली. शेवटी ती तोंडावर थोडं हंसूं आणून म्हणाली, 'आतां ठीक चाललंय. पैसे मिळतीलसं वाटतं. मग हॅरीला नवा लाकडी पायही आणतां येईल. सध्याचा जुना पाय नीट बसत नाही ;त्याचा त्याला त्रास होतो. नवा पाय घे म्हणून मी त्याला आग्रह करते, पण तो घेत नाही. त्याचा स्वभावच असा आहे. आधी दुसर्याचं सुख अन मग आपलं सुख पाहायचं.... 'म्हातारीचं ते बोलणं ऐकता ऐकताच लिलिअन एकदम उठून उभी राहिली. लांबवर पसरलेल्या सपाट रस्त्याच्या टोकाला एक गाडी चकाकलेली तिला दिसली होती. ती उभी राहिली, व तिनं आपले ओठ घट्ट दाबले. ही गाडी जर उभी राहिली नाही तर हातांतली कुंडी फेकून तिच्यावर मारायची आणखी तिला उभं रहायला भाग पाडायचं असा वैतागाचा विचार तिच्या मनांत आला होता. तिनं 'डॅफोडिल' फुलांची कुंडी उचलली आणि एखादी मशाल डोक्यावर घेऊन हालवावी त्याप्रमाणे ती हालविण्यास प्रारंभ केला. सळसळणारया रक्तानं तिचं कपाळ धडधडत होतं, तिचा घसा कढत झाला होता, व तिचा उंचावलेला हातदेखील थरथरत होता. ज्याचे भयानक परिणाम होतील असं काही तरी कृत्य संतापाच्या भरात आपण करणार असं तिला वाटलं. पण गाडी आली ती एकदम सावकाश चालू लागली. तिला एकदम सुटका झाल्यासारखं वाटलं. आपली इच्छा पूर्ण झाली म्हणून अभिमानही वाटला, आणि हातात कुंड्या घेऊन ती गाडीकडे गेली तेव्हा ती हसत होती. तिला जो विलक्षण हर्ष झाला होता तो तिला त्या क्षणी कळला नाही पण नंतर कळला ;आणि तिच्या असंही लक्षात आलं की ट्रॅव्हर्सवतिची म्हातारी आई जी धडपड करीत होती तिच्याशी आपण एकरुप झालो आहोत. उन्हाळ्याचे दिवस एकामागून एक उलटू लागले तसतशी ती ट्रॅव्हर्सच्या व त्याच्या आईच्या धडपडीशी अधिकाधिक समरस होत गेली. जुलाय महिना आला तेव्हा बटाट्याच्या वाफ्यात तांबुस फुलं दिसू लागली, 'राॅस्पबेरी' ना फळांचा पहिला बहर आला, आणि बांबूंवर चढविलेल्या त्या वेली हिरव्या चंदेरी पल्लवांनी व तांबूसजोरदार रत्नखडयांसारख्या वाटणाऱ्या फळांनि डंवरुन गेल्या. उन्हानं तापलेल्याजमिनीतून धुरळा उठलेला जिकडे तिकडे दिसू लागला. शनिवारी तिसऱ्या प्रहरी फॅक्टरीतली तिची कचेरी बंद झाली की लिलिअन कधी ट्रॅव्हर्सबरोबर त्याच्या गाडीतून तर कधी एकटीच 'बस' नं वाडीवर जात असे. प्रथम प्रथम ती फक्त दोन चार घटका तिथे थांबत असे. पण मग ती रात्रीही तेथे राहू लागली.आणि नंतर हलके हलके आठवड्याअखेरचे दोन्ही दिवस तिथेच काढू लागली. पाणी ओढणं, शेतातले तण खुरपून काढणं, जमीन उकरणं,रोपटी लावणं, किंवा स्वयंपांकघरात म्हातारीला मदत करण्यासाठी बटाटे सोलणं, चहा करणं, अशी कामं कुणी न सांगतांच ती करु लागली.राॅस्पबेरी' चा मोसम सुरु झाला तेव्हा फळं खुडून टोपल्यात भरण्याच्या कामी ती ट्रॅव्हर्सला मदत करु लागली. सूर्यास्ताची वेळ झाली की ती स्वत:, ट्रॅव्हर्स, आणि त्याची आई अशीतिघेजण फळं खुडण्याचं काम सुरु करीत. प्रकाशानं उजळलेल्या वातावरणातून दूरच्या चर्चमध्ये संध्याकाळच्या प्रार्थनेच्या वेळी होणाऱ्या घंटेचे घण घण आवाज तिला काहीवेळा ऐकू येत. मग ते आवाज थांबले की जिकडे तिकडे इतकी स्तब्धता होत असे की परडयातल्या भिंतीच्या विटांवर 'थ्रश' पक्षी गोगलगाई पकडण्यासाठी चोची मारीत ते आवाज तिला ऐकू येत. मखमली सारखी मऊ मऊ पिकलेली फळं तोडण्याचं त्या तिघांचं काम रात्र पडली तरी चालूच राही. एखाद्या चांदण्या रात्री ती तिघेजण खूपच वेळ फळं तोडीत राहिली. किंचित पिवळसर चांदण्यांत ती परिपक्व फळं आणि ती तोडताना त्या तिघांच्या हातांवर पडलेले डाग काळसर दिसत होते, आणि फळांनी भरुन एकावर एक रचलेल्या बुरडी टोपल्यांचा ढीग 'पॅगोडा' सारखा भासत होता. अखेर 'बस झालं' असं म्हणून ट्रॅव्हर्सनं मेणकापडाचा एक भला मोठा तुकडा त्या ढिगावर टाकला. ट्रॅव्हर्सची आई म्हणाली, 'मी घरात जाऊन काहीतरी खायचं तयार करते. तुम्हाला दोघांना फार भूक लागली असेल'. ती गेली, आणि ट्रॅव्हर्स व लिलिअन दोघंच मागं राहिली. सुमारे अर्ध्या तासानंतर ती दोघं घरात जाण्यासाठी शेतातून चालू लागली. दिशा अगदी स्तब्ध होत्या, आणि बटाट्यांच्या फुलांवर, राॅस्पबेरीच्या पानांवर, आणि घराच्या छपरावर पडलेलं चांदणं चकचकीत शुभ्र साईसारखं भासत होतं! चालता चालता ट्रॅव्हर्स एकदम थबकून उभा राहिला. त्यानं आपले दोन्ही हात प्रथम तिच्या खांद्यावर ठेवले, व नंतर तिच्या दोन्ही गालांना स्पर्श केला. किंचित वर उचललेलं तिचं तोंड चंद्रप्रकाशांत न्याहाळून पाहात तो कांही वेळ तसाच उभा राहिला. आणि मग म्हणाला, 'तू दमली असशील. मला माहित आहे तू फार दमली आहेस.' ती म्हणाली, 'छे छे! दमायला काय झालंय?' त्याचे हात तिच्या गालांवरुन खाली सरकले व अतिशय प्रेमानं आणखी एकदम मायेचा उमाळा आल्याप्रमाणे त्यानं त्या हातांनी तिच्या खांद्यांना स्पर्श केला. तो म्हणाला, 'तू माझ्याशी लग्न केव्हा करणार ते मला सांग.' आणि लगेच आपले शब्द दुरुस्त करण्यासाठी तो पुढे म्हणाला, 'नाही नाही,केव्हा करणार ते सांग असं नाही माझं म्हणणं ;माझ्या विचारण्याचा अर्थ असा की करशील काय? तुझी इच्छा आहे काय?' त्याच्याकडे नव्हे तर त्याच्या पलीकडे पाहिल्याप्रमाणे पाहात ती उभी राहिली. काय करावं किंवा काय बोलावं ते तिला कळेना. 'तू आताच सांगावंसं असं नाही माझं म्हणणं' तो म्हणाला. 'आताच सांगितलं पाहिजेस असं नाही.' लिलिअन अगदी स्तब्ध राहिली. अजूनही तिच्यातोंडून शब्द बाहेर पडेनात. जिकडे तिकडे भरलेल्या चांदण्याकडे शून्य दृष्टीने पाहात ती उभी राहिली. (क्रमश:)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा